आदिवासी गावातील एक घर.. जुन्या कौलांचं (इथे देशी नळे म्हणतात) ..लांबच्या लांब पडवी ...आणि 3 समांतर खोल्या... जमीन शेणाने सारवलेली .."बेन माटे कुर्सी लाओ" (बेन साठी खुर्ची आणा) म्हणत प्रेमाने आणून ठेवलेली एकुलती एक खुर्ची
बेन घणा दिवसे आव्या (बेन खूप दिवसांनी आलात) म्हणत गलीबेन ने तोंडभर हसत स्वागत केलं .मीटिंग संपल्यावर आम्ही गलीबेनच्या घरी च डाळ- भात जेवणार होतो...आत शिरताच आतल्या खोलीतल्या कोठ्यानी कोणाचंही लक्ष वेधून घ्यावं ...ह्या मातीच्या? कोणी बनवल्या? कधी? एवढा साचा कुठून आणलात?
काय ठेवतात त्यात?माझ्या प्रश्नांची सरबत्ती सुरु...
आत्ता पर्यंत आम्ही मीटिंग मोठ्याला आंब्याच्या झाडाखाली केली होती त्यामुमुळे गलीबेन च्या घरातील कोठ्या मी पहिल्यांदा च पाहिल्या...
"बेन मातीच्याच बनवतो... माझ्या सासू ने बनवल्या आहेत..किती वर्ष जुन्या माहिती आहे? 70 वर्ष होऊन गेली ..मी लग्न होऊन आले (12 व्या वर्षी) त्या वेळी बनवलेली हि शेवटची ... म्हणत दाखवली हिला 60 वर्ष झाली....
"त्या वेळी कोदरी (एक कडधान्य) पिकवायचो ..वर्ष भराच यात साठवायचं... मोठं कुटुंब होतं आमचं..15 माणसं व्हायची जेवणाला...72 वर्षांची गलीबेन ची सासू (आज्जी) चा जुन्या आठवणी सांगताना चा आनंद चेहऱ्यावर ओसंडून जात होता...
"मने नही आवडतू " मला नाही येत कोठी बनवायला.. ती ने म्हणाली ...
" गावात कोणालाच नाही येत अश्या कोठ्या बनवायला... आता बेताच्या बनवतो, टोपल्या... आणि तेवढं धान्य तरी कुठं साठवतो? ...थोडं घरा पुरतं ठेवून विकतोच सगळं..."
आता काय ठेवलंय? एका कोठीत थोड्या तुरी ठेवल्या होत्या (आम्ही डाळ करून आणत नाही, घरीच करतो जात्यावर, आज खाशील तूरडाळीची आमटी"
या 72 वर्षांच्या आज्जीने सकाळी जात्यावर बसून तुरी भरडून डाळ केली? "हां बेन"
किती उत्साह.. कि आज आमच्या घरी मीटिंग आणि पाहुणे जेवतील... हे प्रेम, आपुलकी... आता मिळणे कठीण...
"खरी गंमत दाखवू?" आज्जी लहान मुलाच्या उत्साहाने म्हणाल्या... हो दाखवा ना..सगळंच अद्भुत आहे इथं" मी म्हणाले
"आज्जी कोपर्यातल्या कोठीत हात घालण्यासाठी रचून ठेवलेल्या पोत्यांवर अगदी सहज चढल्या...आत धुंडाळत त्यांनी त्यांनी एक लालसर धान्य बाहेर काढले ...माझ्या प्रश्नार्थ चेहऱ्याकडे पाहून आज्जी म्हणाल्या "कोदरी म्हणतात ती ही" हे 45 वर्ष जुनं आहे धान्य ..."45 वर्ष??" हो आता कोणी करत नाही गावात.. आम्ही पण नाही पेरली ...सासरे गेल्यापासून ' ..."आ बेन एमना हातनी एटले बगाडवी नहीं ...अमोने " सासऱ्यांने त्याच्या हाती कष्ट करून पिकवलेले शेवटचे धान्य "कोदरी" त्याची आठवण म्हणून 45 वर्षे साठवून ठेवणारी आज्जी....
"बेन गाममां कोई ने तकलीक थाय तो अमोना घरेथी लई जाय ...आजे पण .अमे जे होय ते आपीए...(गावात कुणाच्याही घरी धान्य नसेल तर इथून घेऊन जात) ...त्या कोठीने किती भुकेल्याना खाऊ घातलं असेल ??...आणि हे सगळं...कुठेही गाजा वाजा न करता ...
तिच्या हातावरचं ते धान्य बघताना मी तिच्या डोळ्यात तिच्या संसाराच्या आठवणी पाहत होते....ती नवलाईची सून म्हणून घरात आली असेल.. धान्य फाफडायला, कोठी सारवायला, आत धान्यभरायला, कोठी चं तोंड मातीने लिंपायाला तिच्या सासूला, चुलत सासू ला मदत केली असेल... हळू हळू काही वर्षांनी ही कोठीचं मॅनेजमेंट तिच्या ताब्यात आलं असेल...अडीअडचणीला, सणासुदीला या कोठीतून धान्य काढून लोकांना दिलं असेल...किती समृद्ध आठवणी....
मी पाहिलं कि, ह्या आठवणी मात्र इतिहास नव्हत्या पण आजही आज्जीच्या घराचा कणा आहे ....गरीब परिस्थितीत हसत मुखाने समाधानी आयुष्य जगण्याची किल्ली आहे...
त्या वास्तूत हे समाधानाचे तरंग पसरलेले आहेत आणि पुढल्या पिढीला हि तोंड भर जिद्दीने जगण्याची, संकटं पेलण्याची आणि हसत हसत जीवनात सहजतेने पुढे जाण्याची, फक्त मी नव्हे तर आम्ही म्हणून बघण्याची शक्ती त्या तरंगातून मिळतेय ...
मी ही काही वेळ ह्या तरंगाना अनुभवत आणि समृद्ध बनले.... आणि मग आज्जीच्या आणि गलीबेनचा निरोप घेऊन दुसऱ्या गावी जायला निघाले ...
(हे लिखाण वाचून फोटो परत एकदा पाहावेत)
पंक्ती
No comments:
Post a Comment